नशीब भाग - ७३

प्रत्येक क्षण हा म्हटला तर एक प्रसंग असतो, जर त्या प्रसंगाची दखल घेतली तरच त्याचे महत्त्व असते. कोणत्याही प्रसंगाची दखल घेणे हे संवेदनाशीलतेशी संबंधीत आहे. ती संवेदनाशीलता असणे हेच माझे नशीब आहे. हेच पाहाना, मी पूर्वी राहतं होतो, त्या तिथे पलीकडे. . . . शेजारी एक शेजारीण, सर्वार्थाने बाई होती म्हणजे तसे माझे मत होण्याचे कारणही तसेच होते. ती व तीच्या एका मुलीला नवर्‍या वींना राहणे शक्य होते व राहणे त्यांनी निवडले होते. हे मला कळण्याचे कारण म्हणजे माझे भोचक का खोचक प्रश्न. तिने तिच्या लहानपणाचे फोटो मला दुरुस्तीला दिले होते म्हणून समजले. त्या इमारतीत तीच्या मालकीच्या, हक्काच्या जागेत ती राहतं होती. तिच्या मालकीची एक चार चाकी पण होती. ती त्या इमारतीची प्रेसिडेंट होती त्यामुळे मालकीण होती असाच तिचा थाट होता. तिची दुसरी सौ. मुलगी युपीतून आलेली होती, माझ्या कडे इंग्रजी शिकायला आली. इंग्रजी बोलता आले की एका शाळेत तिला नोकरी ती पण पुण्यात मिळणार होती. ती बया एम ए झालेली होती.

मी इंग्रजी शिकवतो म्हणजे काय तर इंग्रजीतून विचार कसा करायचा ह्याचे प्रात्यक्षिक घेतो. मी तिला तिचे नाव, कुठे शिकली, विषय काय होते, वगैरे सांगणे व लिहिणे, जे शक्य असेल ते व तसे करायला सांगितले. तिने ते सगळे हिंदीतून लिहिले व मग मला हिंदीतून ऐकवले. एक मात्र निश्चित समजले की पोरीला निदान काय सांगायचे हे कळलेले होते. तिने मी विचारलेली माहिती सांगताना जरी चूक झाली तरी इंग्रजीतून लिहावे म्हणजे सांगणे सोपे होईल, असे समजावण्याचा मी प्रयत्न केला. तिला ते अपमान कारक वाटले होते. मी तिला हिंदीचे इंग्रजी भाषांतर करून द्यावे हाच तिचा आग्रह होता. तसे केल्याने ती प्रश्नोत्तरात अडकली जाईल व तिला ती नोकरी मिळणार नाही हे मी स्पष्ट केले ते तीच्या आईला पटले पण त्या पोरीला पटत नव्हते. दर दीड तासाला १०० ह्या हिशोबाने १००० आधी दिले तरच मी शिकवणार असे तिला सांगितले. प्रत्यक्षात ती बया अर्ध्या तासातच पळ काढायची. तिने १००० दिले व शिकवणे सुरू झाले. मी तिला प्रश्नोत्तरांचा सराव व्हावा म्हणून बरेच प्रकार दाखवले त्याचे इंग्रजी भाषांतर तिने लिहून घेतले. त्या भाषांतराचे जसेच्या तसे ती रोज पाठांतर करीत होती.

१० दिवसाने तिने मला इंग्रजी शिकल्याचे प्रमाण पत्र मागितले. मी फोटोशॉप वापरून एक प्रमाण पत्र बनवून देणार असे तीच्या आईने तिला सांगितले होते. मी ते नाकारले. अहो त्या पोरीला स्वत: विचार करून अजून एक वाक्य तयार करता येत नव्हते तिला प्रमाण पत्र कसले देणार. लोक मला वेडा ठरवतील व माझी चुकीची प्रसिद्धी होणार हे तिला मी पटवून दिले. शिकवणी त्या दिवसा पासून थांबली. तिला नोकरी मिळाली नाही. मग कळले की तिला इंग्रजी बोलता आले नाही तरी चालणार होते फक्त तीच्या फाईलीत इंग्रजी शिकल्याचे एक प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. त्या नोकरी देणार्‍या बाईने पण पूर्वी तसेच केले होते. त्या नोकरी देणार्‍या बाईने मी प्रमाण पत्र दिले नाही म्हणून मलाच वेडे ठरवले होते असे त्या शेजारणीने सुद्धा मला वेडे ठरवत सांगितले. मी डोक्याला हात मारून घेतला, नशीब माझे अजून काय?

ती शेजारीण बरीच नाटकी होती. तीच्या नातीला एका संस्थेत प्रवेश घेण्याकरता मी तिला तीच्या चार चाकीचा चालक बनून घेऊन जावे म्हणून तिने आधी माझ्या बायकोला फसवले, माझ्या शंकाखोर मनात पाल चुकचुकली, त्या बयेचा काही तरी डाव असणार, तो जाणून घेण्याकरता मी तयार झालो. वाटेत झालेल्या गप्पांच्या रंगात बाई बोलून गेली, "एक बरे झाले, बाहेर जायला मला गाडीचालक शोधावा लागणार नाही. गाडीचालकाचे ५०० देणे त्रासाचे झाले होते." तीच्या नातीला ज्या संस्थेत प्रवेश मिळवायचा होता त्या संस्थेत मी मराठी बोलतो म्हणून मला पुढे केले, त्या लेखनिकाच्या ते लक्षात आले त्याने माझ्याशी बोलण्यास नकार दिला. कारण प्रवेशाकरता त्याला ह्या बाईकडून १ लाख रक्कम वसूल करायची होती. तिथे ह्या बयेने नातीला वडील नाही हिला नवरा नाही ह्याचे डोळे ओले करून छान नाटक केले होते. त्या लेखनिकाने तिचे ९०,००० दोन हप्त्यात घेण्याचे कबूल केले होते. असेच पुढे एका कार्यक्रमाला जाताना पाठीचे दुखणे आहे असे सांगत मला गाडी चालवायला बोलावले होते. पण मी सावध होतो. १००० देणार असशील तरच येईन अशी अट घातली. मग त्या बयेची कटकट थांबली.

त्या नंतर एक नवरा बायको व त्यांची मुलगी (इराणी) इंग्रजी शिकायला आले. नवरा बायको वाणिज्य शाखेची पदवी घेण्या करता भारतात आले होते. मुलगी नुकतीच पहिल्या इयत्तेत जात होती. ह्या जोडीला देखील इंग्रजी वाक्यांचे फारसीत भाषांतर करून हवे होते म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिणे सोपे झाले असते. कसेबसे सहा महिने ती दोघे येत होती मग कधीतरी एकदम उगवायचे. त्या दोघांना माझ्या बोलण्याचे फार आश्चर्य होते, एक साधारण तंत्रशिक्षण घेतलेला माणूस प्रत्येक विषयातले अनुभव कसे सांगू शकतो, तेही फारसी भाषेतून जे त्यांना समजायला मदतीचे झाले होते. त्यांनी माझी बर्‍या पैकी जाहिरात केली होती. म्हणूनच वाणिज्य शाखेतील एमकॉमचे प्रमाणपत्र मिळवण्याकरता आलेले दोन इराणी मला भेटायला आले. दोघे सहकुटुंब भारतात आले होते. त्यांना त्यांच्या विषयातील इंग्रजी वाक्ये फारसीतून समजवून देणे व इतरांचे दैनंदिन संवाद हिंदी मराठीतून काय असतात त्या विषयी त्यांना फारसी भाषेतून माहिती देणे असे माझे काम झाले होते.

परंतु शिकवणीच्या शेवटचा एक तास, हिंदू समाज, रचना, रीतिरिवाज व वर्तमान राजकारण ह्या वर चर्चा होत असे. त्यांचे विचार झापडे बांधल्यासारखे चाकोरीतले होते. मी त्यांना इराणी समाजातील आंधळेपणा कसा सुरू झाला व होतो आहे हे पटवून देण्यात बराच यशस्वी झालो होतो. त्यातल्याच एका इराण्याच्या बायकोने माझी इंग्रजी शिकवणी सुरू केली. मी नेहमी प्रमाणे १० तासाचे पैसे आधी घेतले. चार तास पूर्ण झाले असताना पुण्यात राहणे शक्य नव्हते म्हणून ती तीच्या शाळेत जाणार्‍या मुलीला घेऊन इराणाला परत गेली. मुली करता भरलेले ४० हजार शाळेने देण्याचे नाकारले, तसेच त्या बायकोला परवाना मिळावा म्हणून एका संस्थेला ६०० डॉलर दिले होते ते सगळे वाया गेले होते. पण तिचा नवरा माझ्याकडे मी न शिकवलेल्या सहा तासाचे पैसे मागायला आला होता, मी ते माणुसकीच्या नात्याने त्याला परत करावे असे त्याचे मागणे होते. पैसे परत नकरणारे माणूसकीने वागले पण मला माणूसकी कळत नाही असे  तो सांगून गेला,  नशीब माझे अजून काय?

मुस्लिम आर्किटेक्चर व त्याचा घोळ ह्या विषयीची फार चांगली माहिती एका इराणी आर्किटेक्ट महिले कडून मला मिळाली, ती तिचा मुलगा, मुलगी व नवरा असे चार जण माझ्या कडे इंग्रजी - हिंदी - मराठी संवाद व भाषांतराकरता अजूनही येतात. भारतात आर्किटेक्चर विषयातील तसेच कॅलिग्राफी विषयातील डॉक्टरेट मिळते हे ऐकून मला धक्काच बसला. अहो हे इराणी दांपत्य असल्या डॉक्टरेट मिळवण्या करता भारतात आले. आश्चर्य बघा आपली काही मंडळी परदेशात आर्किटेक्चर शिकायला जातात. हा घोळ समजून घेण्यात मला फार उत्सुकता होती ती बर्‍याच अर्थाने साकार झाली. ते पुन्हा कधी तरी सविस्तर सांगेन.

मोठ्या मुलाच्या लग्नात माझा निकॉन पी९० कॅमेरा खाली पडला, त्याचे लेन्स बदलणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले, खर्च १५००० रुपये, अहो मी कॅमेरा २५००० ला घेतला होता. मोठ्या मुलाने तो कॅमेरा घरी उघडला त्याचे हे चित्रण, पटकथा नसली की चित्रण कसे बिघडते ह्याचा हा एक नमुना.



माझे इतर व्हिडिओ चित्रण, हा दुवा

3 प्रतिसाद:

मुक्त कलंदर said...

काका तुमची नविन पोस्ट वाचली. तुमचे अनुभव तुम्ही अतिशय योग्य शब्दात मांडता आणि त्यावरुन काही तरी शिकायला मिळते. हे माझे तरी मत आहे.

विनायक रानडे (VK) said...

नमस्कार, प्रतिक्रीया वाचून अानंद दिलात, लिहायला अजून हुरुप येतो.

Mohinee said...

सर्टिफिकेट ही नावाचीच गोष्ट असते आणि त्यात भूषण पण असते, असंच सगळीकडे समजलं जातं, असं दिसतंय.

मला योग्यता असूनही सर्टिफिकेट मिळायला बराच त्रास झाला. आणि जावाचे तर मिळाले पण नाही. पण इतरांना परीक्षेशिवाय मिळायची हे संगणक प्रशिक्षणात मी पाहिलं. त्यांना चापलुसी ची गरज होती.

शेवटी मी घरी शिकण्याचच ठरवलं. आपले उदाहरण आणि हे यात मूळ तत्वनिष्ठेचे साम्य दिसले म्हणून सांगावेसे वाटले.

तडजोड करायची नाही म्हटली की असे अनुभव रोजचेच. नोकरीबाबतही असेच अनुभव आले.

इतका त्रास भोगुनही जगण्याचे जे समाधान असते, ते काही वेगळेच!

आपण याचे पुस्तक प्रकाशित केले तर फारच छान होईल. :)