२००४ च्या बर्याच प्रसंगांनी घरातले आम्ही सगळेच खूप त्रासलो होतो. म्हणून पत्रिका बघणार्या त्या बाईंना (नशीब भाग ६२) भेटायला आम्ही गेलो असताना त्यांचे सातारचे गुरु तेथे आले होते त्यांची भेट आम्ही घेतली. आमचे प्रश्न नीट समजून घेतल्यावर त्यांनी मला सातारला भेटायला बोलावले होते. मी माझ्या मोठ्या मुलाबरोबर सातारला गेलो. त्यांच्या पूजेच्या जागे भोवती बरीच मंडळी जमली होती. प्रत्येकाचे शंका निरसन केले जात होते. पूजेतला प्रसाद व भस्म पुडीत बांधून दिले जात होते. सगळ्यात शेवटी आमच्या करता पुजा सुरू झाली. मंत्र झाले मग एक काळ्या रंगाची बाहुली व एक लिंबू आम्हाला त्यांनी दिले त्याचे ५०० रुपये आम्ही दिले. आम्ही संध्याकाळी घरी परतलो. सातारचे खास ताजे पेढे मी घेतले होते.
दुसर्या दिवशी संध्याकाळी सातारचे ते खास लिंबू घरात सगळी कडे ओवाळून बाहेर बाल्कनीत जाळायचे होते त्याप्रमाणे ते ओले पिवळे लिंबू आम्ही जाळले फार घाण वास येत होता. ते लिंबू पूर्ण जळल्या नंतर खाली जाऊन जमिनीत ती राख आम्ही पुरली व त्यावर पाणी टाकले. मग जवळच्या नदी किनार्याला जाऊन ती काळी बाहुली एका खड्ड्यात पुरली. हे सगळे चुकीचे आहे असेच वाटत होते. पण आम्हाला होणार्या रोजच्या त्रासामुळे हे सगळे करणे मान्य करावे लागत होते. घरी आलो एक वेगळीच शांतता जाणवली. रात्री आठच्या सुमाराला एक फोन आला. फोन करणारा अनोळखी होता. त्याला आमची माहिती एका मित्राने दिली होती. माझ्या मुलाला जर्मन भाषा अवगत होती व अॅपल संगणकाची चांगली माहिती असल्याने काही महत्त्वाच्या कागद पत्रांचे XML रुपांतर करून एका जर्मन कंपनीला त्याच रात्री पाठवायचे काम आम्ही करू शकतो का, तसेच बर्याच विषयावर बोलण्या करता आमची भेट शक्य आहे का असा तो फोन होता. रात्री दहाच्या सुमारास तो फोन करणारा व त्याचा युपीवाला भैय्या जोडीदार आमच्या घरी आले.
घरात त्या दिवसाचे भजनांचे ध्वनी मुद्रण काम दुपारी संपलेले असल्याने वाद्य व इतर साहित्य विखुरलेले होते. फोन करणारा जाहिरात क्षेत्रातील अनुभवी मराठी तर तो युपीवाला भैय्या त्याचा भांडवलदार होता. माहितीची देवाणघेवाण चालू होती. तो भैय्या दर ३० मिनिटाला बरोबर पुडीत बांधून आणलेले पान खात होता. मोठ्या मुलाने कामाचा खर्च ७ हजार रुपये सांगितला. पैसे रोख मिळणार नव्हते पण एक नमुना आवश्यक होता म्हणून काम सुरू केले. कामाचा वेग बघून आलेले दोघे खूश झाले होते. आमच्या फोटो, व्हिडिओ व ध्वनी मुद्रण कामाची थोडी झलक त्यांना बघायला मिळाली. पुढील दोन महिन्याच्या कामाचा आराखडा तयार झाला. XML चे काम तयार होऊन त्या जर्मन कंपनीला पाठवले गेले. रात्रीचे तीन वाजले होते त्या दिवशी पुण्यातल्या जंगली महाराजांच्या करता तयार झालेले हे भजन त्या दोघांना मी ऐकवले होते तुम्ही पण ऐका - योग ज्ञानी मंत्र ज्ञानी तंत्र ज्ञानी जंगली शहा -
हे गाणे आकाशवाणी पुणे केंद्राच्या श्री शरद सुतवणे ह्यांनी म्हटले आहे. त्यांच्या राहत्या घरात फक्त ध्वनी फीत सोनी डिव्हीकॅम कॅमेरावर मी मुद्रित केली. मग माझ्या घरात श्री अशोक काळे यांची पेटीची साथ संगणकावर मी मुद्रित केली. त्या नंतर श्री पद्माकर गुरव ह्यांच्या ढोलकीची साथ मुद्रित झाली. नंतर ह्या प्रत्येक फितीवर प्रक्रिया केल्यावर एक सलग गाणे तयार झाले. ह्या ध्वनी मुद्राणाचा दर्जा श्रोत्यांनी ठरवावा. कुठेही साउंडप्रुफ स्टुडिओ, महागडे मायक्रोफोन, महागडी मुद्रण व्यवस्थेचा वापर झालेला नाही म्हणून ह्या माझ्या प्रयत्नांना महत्त्व मिळाले नाही, अजूनही मिळत नाही. मला खात्री आहे महत्त्व कधीच मिळणार नाही! नशीब अजून काय असावे?
दोन दिवसाने भजनांच्या कामाचे पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले. बर्याच दिवसात आमच्या हातात काही हजाराची रक्कम आली होती. त्या पूर्वी सहा महिने खिशाला गळती लागलेली होती. हा त्या बाहुली/लिंबाचाच परिणाम असावा अशीच समजूत त्या वेळी आम्ही करून घेतली. त्या नंतर सातारच्या महाराजांना पुढचे काम चांगले व्हावे म्हणून १५००० रुपये द्यावे लागणार होते पण मी भेटायला गेलो नाही. त्या नव्याने ओळख झालेल्या जाहिरात कंपनी बरोबर मी व मुलाने बरीच कामे केली. त्या कंपनीचे सगळ्या संगणकांचे सुसूत्र सुध्दीकरण (ट्यूनिंग) आम्ही करून दिले त्यामुळे संगणकांच्या कामाचा वेग वाढला, अकारण संगणक बंद होणे/लटकणे (हॅंग होणे) आम्ही थांबवण्यात यशस्वी झालो. असे म्हणण्याचे कारण असे की मुलाचा व माझा अॅपल संगणक प्रणालीचा १९९४ पासूनचा अनुभव होता तर विंडोज एक्सपी प्रणाली आम्हाला सर्वार्थाने नवीन असूनही आम्ही हे करू शकलो होतो.
ह्या जाहिरात कंपनी करता मगर पट्टा सिटीतील एका आयटी कंपनीचे व्हिडिओचे काम मी केले. पुणे रेल्वे स्टेशनच्या २४ तास कार्यरत असणार्या रेस्टॉरंटचे खाद्य पदार्थांच्या फोटोचे व व्हिडिओचे काम मी केले. ते पैसे व XML कामाच्या पैशाचे व्यवहार नीट न झाल्याने त्या भैय्याचे काम करणे मी नाकारले. काही महिन्यात ह्या युपीच्या भैय्याने भाईगीरी करून त्या मराठी माणसाला सोडून दिले. माझ्या मुलाला हाताशी धरले. काही तरी रक्कम हातात यावी म्हणून मुलाने त्याच्या बरोबर नव्याने काम सुरू केले. मुलगा सावध होता म्हणून आम्ही फारसे अडचणीत आलो नाही. एन आय बी एम कोंडवा भागातील नवीन जागेत काम सुरू झाले. मुलाला कामात जास्त वेळ देता यावा म्हणून जवळच भाड्याचे घर देण्याचे कबूल केले. त्याच काळात आम्ही राहत होतो त्या इमारतीत राहणार्या एका माथेफिरुशी भांडण झाल्याने मी माझी जागा विकायला काढली. आम्ही भाड्याच्या घरात राहिला आलो. परंतु त्या भैय्याने भाडे भरण्यात टाळाटाळ सुरू केली. पण त्याचे व आमचे घरगुती संबंध जास्त वाढले. त्यात त्या भैय्याचा बराच इतिहास व गुंडागर्दी आम्हाला ऐकायला मिळाली. त्यात त्याने बंदुकीचा वापर करून लखनौ - कानपूर भागात धान्याचा व्यापार कसा केला व पोलिसांना फसवून पुण्यात कसा आला ह्याची पण कहाणी सांगितली.
हो त्यावेळी ती कहाणीच वाटली पण नुकत्याच उघडकीला आलेल्या युपीतील धान्य घोटाळ्याने त्या कहाणीची सत्यता मला आज पटली. ते काही लाख टन धान्य निवडूकीचा एक भाग म्हणून गरीबांना वाटण्या करता केंद्राकडून युपी सरकारला पाठवले जात होते ते राशन दुकानात न जाता सरळ दुसर्या प्रांतात जात होते. एवढेच नाहीतर नेपाळ, बांगलादेश, रशिया व इतर देशात विकले गेले. त्या घोटाळ्यात हा भैय्या एक कंत्राटदार होता (हे आता कळून काय उपयोग?). युपीतून पळ काढून ह्या भैय्याने राजस्थानात रासायनिक खतांचा कारखाना काढला. तिथे देखील गोंधळ घातला होता. पोलिसांना चुकवून पळ काढण्यात यशस्वी झाला होता. नशीब बघा इतकी फसवाफसवी करून हा भैय्या पुण्यात दोन दोन मोठ्या चारचाकी गाड्या घेऊन एका कंपनीचा मालक म्हणून मिरवत होता. मी आणि मुलगा तिस लाखाची आधुनिक उपकरणे हातात असून सुध्दा कोणी काम देईल का म्हणून भटकत होतो. काम मिळालेच तर पैशाच्या व्यवहारात फसवले जात होतो. त्याचा हा दुसरा नमुना - सचिन पिळगावकरच्या ’नवरा माझा नवसाचा’ ह्या सिनेमाचे शीर्षक ऍनिमेशनच बाबतीत घडलेला प्रसंग पुढील भागात. . . .
ह्याच काळात धाकटा मुलगा सिबिएस्सी बोर्डातून १०वी पास झाला. पुढचे शिक्षण व्हावे म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठाला (गेल्या वर्षीच सरकारने मान्यता रद्द केली) संलग्न असणार्या संस्थेत संगणक - नेटवर्क डिप्लोमा करता धाकट्याने नाव नोंदवले. दुसर्याच महिन्यात त्याची कुरकूर सुरू झाली. शिक्षक सारखे बदलत होते, सोडून जात होते. काही विषयांना शिक्षकच नव्हते. वाचनालयाचे वेगळे पैसे दर महिन्याला घेतले जात होते पण संगणक विषयाची पुस्तके नसून जुनी मासिके ठेवली होती. सहा महिन्यात ती संस्था त्याच्या बर्याच मित्रांनी एकाच वेळी सोडली. डिपॉझिटचे पैसे मिळवण्या करता खूप त्रास झाला. मग ऑटोमोबाईल इंजिनीरींगच्या डिप्लोमाला दुसर्या एका संस्थेत नाव नोंदवले. चक्क मोटर मेकॅनिकच्या प्रशिक्षणाला ऑटोमोबाईल इंजिनीरींगचे गोंडस नाव दिले होते. पालकांनी भरपूर रक्कम देऊन मुलांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे केले होते. ज्ञान हा शब्द फक्त नावाला होता. पण परीक्षांचे नाटक फार छान रंगवले होते. दर वर्षी तीन महीने प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा खेळ चांगला रंगवला होता. मुलाने हिरो होंडा व मारुती सेवा विभातात काम केले पण ते हवा, पाणी, तेल वगैरे बदलण्याचे हमाली कामच होते.

व्हिल बॅलन्सींग, टो - कॅस्टर - कॅम्बर अॅंगल, कार्ब्युरेटर - नोझल सेटिंग्ज, फायरिंग ऍडव्हान्स/रिआर्ड सेटिंग्ज, शॉक ऑब्झॉवर सेटिंग्ज हे प्रकार कधीच बघायला / हाताळायला मिळाले नाही. हे सगळे प्रकार मुलाने ग्रॅन्ड टुरीस्मो डीव्हीडी खेळातून बघितले व आत्मसात केले होते पण ते प्रत्यक्षात दुचाकी/चारचाकीवर कसे साधले जाते ह्याचा अनुभव त्याला किंवा इतरांना मिळालाच नाही किंवा मिळू नये ह्याची खबरदारी घेतली गेली होती. खरोखर भारतात शिक्षण व प्रशिक्षणाचा खेळ माजवण्यात राज्यकर्ते व शिक्षण सम्राट आपली पाठ थोपटून घेत आहेत व येणार्या पिढीला अर्धवट माहिती (ज्ञान कशाला म्हणतात?) देण्याचे पाप करीत आहेत हे पालकांच्या लक्षात येत नाही किंवा जाणतेपणाने दुर्लक्ष केले जात आहे. नशीब अजून काय म्हणायचे?



