Showing posts with label नशीब भाग - ६९. Show all posts
Showing posts with label नशीब भाग - ६९. Show all posts

January 18, 2011

नशीब भाग - ६९

मागच्या भागात मी एका युपीवाल्या भैय्याने सुरू केलेल्या जाहिरात कंपनीचा उल्लेख केला होता त्याच जागेतील हे काही अनुभव आहेत. ही कंपनी पाषाण - सुस भागातून कोंढवा भागात आल्यावर पहिले दोन महिने त्याने सगळ्यांचे पगार वेळेवर दिले नंतर पूर्ण पगार न देता दोन तीन भागात विभागून दिले. त्याच काळात "नवरा माझा नवसाचा" ह्या चित्रपटाचे शीर्षक ऍनिमेशनचे काम कंपनीच्या कलाकारांनी पूर्णं केले त्याचे फ्लॅश ऍनिमेशन कंपनीच्या साधारण संगणकांवर व्यवस्थित घडवून आणण्यात माझ्या मोठ्या मुलाने खूप मदत केली. ते फ्लॅश ऍनिमेशन फिल्म वर चढवण्याचा प्रकार मुलाने करून दाखवला त्या मुळे निर्माता सचिनचे काही लाख रुपये व वेळ वाचला. त्या कामाचा मोबदला म्हणून त्या सिनेमाच्या पुण्यातील पहिल्या प्रदर्शन खेळाची तिकिटे जाहिरात कंपनीच्या सगळ्यांना देण्यात आली. हे व्यवसाय म्हणून चुकीचे होते. कामाचा मोबदला पैशात मिळाला तर त्या कलाकाराचे घर चालणार. एका तिकिटाने, एका जेवणाने किंवा जाहीर आभार मानून मदत होत नाही. पण बकरे शोधणे व योग्य ठिकाणी त्यांचा वापर करून घेणे हे अनुभवी सचिन व त्या युपीवाल्या भैय्याला चांगले आत्मसात होते हे त्यांनी सिद्ध केले.

काही प्रसंगच असे घडले की त्या भैय्याच्या अती पान व गुटका खाण्याच्या सवयी मुळे त्याच्या तोंडात कॅन्सरची वाढ त्रासदायक झाली होती, त्याची जीभ कापावी लागली होती. त्या करता १० दिवस त्याला दवाखान्यात ठेवले असताना परदेशातून येणार्‍या जाहिरातीच्या कामाचे पत्रव्यवहार माझ्या मोठ्या मुलाला बघावे लागले होते. त्यातून त्याच्या लक्षात आले की प्रत्येक जाहिरातीचे कंपनीच्या कलाकारांनी पाच ते सहा नमुने दर वेळा तयार केले होते. त्या प्रत्येक नमुन्याचे पैसे त्या भैय्याला मिळाले होते परंतु हा भैय्या १० जाहिराती ऐवजी फक्त २-३ जाहिरातीचेच पैसे मिळाले असे सांगून पगार वेळेवर देणे टाळत होता. तो दवाखान्यातून परतल्यावर मुलाने सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन गेल्या काही महिन्यात न दिलेल्या पैशाची मागणी केली. बरीच शिवीगाळ हाणामारी झाली माझ्या मुलाबरोबर काही कलाकारांना ती कंपनी रिकाम्या हाताने सोडावी लागली. कंपनीत मागे राहून चुपचाप काम करणार्‍या लोकांनी भैय्याला साथ देण्याचे ठरवले. मग काही दिवसांनी तो भैय्या कॅन्सरने मेला असे मला कळले. पण कानपूर, लखनौ, राजस्थान भागात त्यानी घातलेले घोळ मी आजही विसरू शकत नाही. हा भैय्या जरूर कोठे तरी ह्या देशातील भोंगळ कारभाराचा फायदा घेत नवीन बकरे शोधण्यात मग्न असेल हे नक्की.

हा अनुभवात भर घालणारा अजून एक प्रसंग.  थोडे लाख रुपये साठवले, एक फ्लॅट व गाडी मिळवली की भांडवलदार झाल्याच्या दिमाखात मिरवणार्‍या बर्‍याच मांसाहारी व्यक्तींच्या संपर्कात मी आलो होतो. ही मंडळी व्यवसायातील बकर्‍यांना शोधून आपला उदर भरणाचा यज्ञ चालू ठेवतात म्हणून मी त्यांना व्यावसायिक मांसाहारी म्हणतो. अशाच एका व्यक्तीच्या संपर्कात मी आलो होतो. त्याने एक कंपनी सुरू केली होती. अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करणारा अभ्यासक्रम CD च्या माध्यमातून शाळांना पुरवण्याचा हा व्यवसाय होता. प्रत्येक विषयातील अनुभवी शिक्षकांना त्याने गोळा केले होते त्या विषयांचे  चित्रण करण्या करता मला बोलावले होते. पुण्यातल्या ह्या क्षेत्रातील व्यवहाराचा बर्‍यापैकी अनुभव असल्याने मी सावध होतो. त्या कंपनीच्या मालका बरोबर मी करार करण्याचा आग्रह धरला होता. दोन भेटीतच तो बकरा शोधक गटाचा सदस्य होता हे सिद्ध झाले. मी लगेच माझे बोलणे बदलले होते. माझी उपकरणे त्याला दाखवायला त्याच्या कार्यालयात घेऊन गेलो व त्याला माझ्या कामाचे प्रात्यक्षिक दाखवले, माझ्या कामाची पध्दत त्याला आवडली होती.

मी दोन विषयांचे नमुना म्हणून चित्रण करण्याची तयारी दाखवली, त्याकरता त्याने मला ५००० रुपये आधी द्यावे मग चित्रफीत तयार झाल्यावर ५००० देणे आवश्यक असण्याची अट मी घातली. ते पैसे देण्याचे तो टाळत होता. एके दिवशी एका उपहार गृहात त्याने मला बोलवले. त्याने माझ्या समोर त्याचे बॅंकेचे पुस्तक ठेवले म्हणाला " विश्वास नसेल तर बघ माझ्या खात्यात पाच लाख रुपये आहेत, मी तुला फसवणार नाही." मी - " जोपर्यंत ५००० माझ्या खिशात येत नाहीत तोपर्यंत चित्रणाला सुरुवात होणार नाही. तू दिलेल्या चहा बद्दल धन्यवाद" मी लगेच बाहेर पडण्या करता उठलो. त्याने मला हात धरून खाली बसवले माझ्या हातात ५००० दिले. ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी १० ला मी माझी साधने घेऊन चित्रणाला उभा होतो. गणित विषयाच्या प्राथमिक माहितीचे १५ मिनिटाचे चित्रण नीटनेटके करण्यात तीन दिवस गेले. फिजिक्स विषयाचे १५ मिनिटाचे चित्रण देखील तीन दिवसात झाले. दोन्ही चित्रणांची चित्रफीत तयार करून बाकी ५००० घ्यायला मी गेलो. त्या मालकाने दुसराच मुद्दा समोर ठेवला. आधी ते चित्रण चार ठिकाणी दाखवणार मग CD खरेदीचा करार संबंधितांनी मान्य  केल्यावर ५००० मला मिळणार होते.

माझ्या कामाची पध्दत बर्‍याच अनुभवांनी घडलेली असल्याने मी ह्या कामाच्या दर्जाचे परीक्षण करण्याचा माझ्या पध्दतीने प्रयत्न केला होता. हे चित्रण मी १२वीच्या एका गटाला दाखवले होते व त्यांचे मत मी समजण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्या दोन विषयाच्या तज्ञांचे मत मी जाणून घेतले होते. शिक्षकांच्या विषय हाताळण्याच्या पध्दती मुळे चित्रित झालेली माहिती विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी होती. मी त्या CD च्या विक्रीत साशंक झालो होतो. शेवटी भांडणाची वेळ आली. मला ५००० मिळाले तरच मी चित्रफीत देईन ह्यावर ठाम होतो. माझे चित्रण त्याला हवे होते तसेच झाले होते हे त्याला मान्य होते पण पैसे खरेदीच्या करारानंतरच मिळतील ह्यावर तो अडला होता. मी माझे चित्रण त्याच्या अपेक्षित दर्ज्याचे केले होते त्याचे पैसे मला मिळणे सरळ व्यवहार होता. ती CD त्याने विकून पैसा मिळवणे त्याचे कौशल्य होते त्यात माझा कुठेही संबंध नव्हता. मला पैसे मिळतील ह्या आशेने मी पाच दिवस वाट पाहिली व फोन करून सांगितले पैसे संध्याकाळ पर्यंत मिळाले नाही तर चित्रण पुसून टाकले जाईल, तसेच घडले. मी बकरा बनलो नाही ह्याचा मला आजही आनंद आहे.

माझा विंडोज व्हिस्टा चा संगणक मी तयार केल्या पासून त्याचा सी.पी.यू व मॉनिटर वेगळा होता. त्यामुळे इतर भाग जोडणार्‍या तारा सगळीकडे लोंबकळत होत्या काल १६/१/२०११ रोजी सकाळी डोक्यात किडा वळवळला मी घरात अडगळीत पडलेल्या आलुमीनीयमच्या पट्ट्या शोधून काढल्या व माझा मॉनिटर सी.पी.यू. च्या डबड्याला छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे लटकवला. प्रत्येक पट्टीला वर एका ठिकाणी साईड पॅनलला स्कृ व नट ने बसवले आहे. त्यामुळे उघडझाप करण्यात अडथळा होत नाही. सगळ्या आवश्यक तारांची लांबी कमी झाल्याने टेबल वरचा व जवळचा पसारा जरा आटोपशीर झाला आहे. वस्तू सहज हाताशी आल्या सारख्या झाल्या आहेत. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहे? वाचताय मग सांगत का नाही? अहो आग्रह नाही पण तुमच्या संपर्कात असावे असे उगीचच वाटते. तुमचे मत कसेही असो जरुर कळवा.