मी लवकर हार मानणारा नाही. सगळे मार्ग शोधून अनुभव घ्यायचा हे मी ठरवले. मार्ग पहिला, व्यवसाय कसा सुरू करवा हे सांगणारे सल्लागार मी शोधले. त्यांनी मला माझ्या व्हिडिओ, ऑडिओ व फोटो व्यवसायाची जाहिरात करावी असे सुचवले. एकाने जाहिरात करणार्या एका कंपनीचे नाव सुचवले. त्या कंपनीचा प्रतिनिधी मला भेटला. त्याने पुराव्या दाखल बरेच फोटो व पत्रके दाखवली. ते बघून तेव्हा असे वाटले की ती कंपनी माझे जाहिरातीचे काम करू शकेल. पैसे ठरले, मी काम सुरू करण्या करता पहिला हप्ता दिला.
दोन आठवडे ठरल्या प्रमाणे सगळे घडत होते. मग माझ्या कामाचे प्रात्यक्षिक म्हणून एक तंत्रज्ञान व साधने ओळख समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले. त्याची जाहिरात झाली. पहाटे चारला वर्तमान पत्र वितरकांच्या अड्ड्यावर जाऊन प्रत्येक वर्तमान पत्रात ते जाहिरात पत्रक टाकण्याचे काम बघून आलो. एका मित्राने त्याची मोठी जागा दिली. १०० माणसांना बसण्या करता खुर्च्यांची व्यवस्था केली गेली. व्हिडिओ प्रोजेक्टर भाड्याने ठरवला होता. रविवारचा दिवस त्या जाहिरात कंपनीने चांगला म्हणून ठरवला होता. १०० जणांना पुरेल इतकी चहा फराळाची व्यवस्था केली होती. वेळ सकाळी १० ची होती. जाहिरात कंपनीने १५० डोक्यांचे आश्वासन दिले होते, त्याच बरोबर त्यांचा एक प्रतिनिधी मदतीला येणार असल्याचे आश्वासन दिले होते.
घड्याळात १२ वाजले, माझ्या त्या समारंभाचे पण १२ वाजले होते. एकही प्रेक्षक फिरकला नव्हता. जाहिरात कंपनीचा प्रतिनिधी मदतीला आलाच नाही. शेवटी माझे मित्र, काम करणारे मदतनीस मिळून आम्ही २० जणांनी १०० माणसां करता केलेली चहा फराळ व्यवस्था आपसात वाटून घरी नेली. पुणे तिथे काय उणे असे ऐकले होते. पण . . . पुणे तिथे काय काय उणे ! ह्या अनुभवाची ती सुरुवात होती. खिन्न मनाने घरी परतलो होतो. तेव्हा बायकोने हळूच एक गौप्य स्फोट केला. समारंभाच्या जागेजवळ रिक्षांतून उतरताना निकॉन कॅमेरा बॅग रिक्षाच्या मागच्या सिटच्या मागे आम्ही विसरलो होतो. ती बॅग रिक्षावाल्याने १ तासा नंतर न उघडता परत सुरक्षित आणून दिली होती. त्या प्रामाणिक पणा करता त्याने बक्षीस नाकारले होते. ह्या सगळ्या झालेल्या गडबडीत मला जास्त त्रास नको म्हणून बायकोने मला तेव्हा सांगण्याचे टाळले होते. त्या जाहिरात व प्रात्यक्षिक प्रकारात माझे ३८,००० रुपये वाया गेले होते. जाहिरातीचा एवढा खर्च करून सुद्धा पुढील सहा महिन्यात एकाही व्यक्तीने मला संपर्क केला नव्हता. माझे नशीब मला असेच धोका देणार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
काही महीने असेच त्रासात घालवले. नव्यानेच ओळख झालेल्या एका महाशयांनी मला अंकित ध्वनी पट्टी मुद्रणाचे (डिजीटल ऑडिओ ट्रॅक रेकॉर्डिंग) काम देण्याचे आश्वासन दिले त्याकरता चाचणी म्हणून दोन गाण्यांचे ध्वनी मुद्रण करायला बोलावले होते. साधने सगळी माझी होती. त्या एका गाण्याचे काम चार पाच तास चालू होते. त्यात बर्याच गोष्टी समजल्या. हे महाशय व त्यांचे एक मित्र संगीत दिग्दर्शन करणार होते. २० ते २४ भजनाचा एक संच एका प्रकाशन संस्थेकरता ही मंडळी तयार करीत होते. मला प्रत्येक गाण्याचे फक्त १००० रुपये मिळणार होते. मला ध्वनीमुद्रण क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल व प्रत्येक तबकडीवर माझे नाव असेल असे सांगण्यात आले होते. तेव्हा पुण्यात माझे अस्तित्व व कला गुण ह्या बाजारपेठेत संबंधितांना समजावे म्हणून हा माझा प्रयत्न होता. पण . . . जे घडले ते वेगळेच होते.
हे संगीतकार महाशय इंजिनिअर होते म्हणून पहिल्या गाण्याच्या मुद्रणाला मला माझ्याच वस्तू ने आण करणे व जोडण्याचे काम दिले होते. ह्या महाशयांनी व्यक्तीगत अंकित ध्वनी पट्टी मुद्रांनाच (डिजीटल सेपरेट ऑडिओ ट्रॅक रेकॉर्डिंग) फार धक्कादायक प्रकार मला करायला लावला. गायक वादकांचे वेगळे मायक्रोफोन असूनही सगळे आवाज एकत्र करून डाव्या उजव्या ध्वनी पट्टी प्रकारात मुद्रित केले. इथे ध्वनीपट्टी प्रकार जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रकार १ - एकत्रित एकच ध्वनीपट्टी (मोनो ट्रॅक).

२ - डावी / उजवी दोन वेगळ्या ध्वनीपट्टया(स्टिरीओ ट्रॅक) ह्या प्रकारात दोन्ही कानांना ऐकू येणारा फरक गायक/वादकांच्या आपसातील अंतराचा आभास निर्माण करण्यास मदत करतात.


३ - व्यक्तीगत अंकित ध्वनी पट्टी मुद्रण (डिजीटल सेपरेट ऑडिओ ट्रॅक रेकॉर्डिंग) ह्या प्रकाराचे मुळात हेच वैशिष्ट्य आहे की व्यक्तीगत ध्वनी पट्टीचे स्वरूप बदलून संपूर्ण एकत्रित ध्वनी पट्टीचा परिणाम फार चांगला साधता येतो. प्रथम संगीतकार एक मार्गदर्शक ध्वनीपट्टी तयार करतो. मग योग्य गायक/वादक निवड होते. मग प्रत्येक वादक ध्वनी संच (हेडसेट) कानाला लावून मुख्य मार्गदर्शक ध्वनीपट्टी ऐकत असताना वाद्य वाजवतो. त्याची प्रत्येकी एक ध्वनीपट्टी मुद्रित होते. सगळ्यात शेवटी गायक/गायिकेच्या वेगवेगळ्या ध्वनी पट्टीचे मुद्रण होते. मग संपादन होते. व्यक्तिगत ध्वनी पट्टीची अपेक्षीत सुधार प्रक्रिया घडवली जाते. सरते शेवटी अपेक्षीत परिणाम साधण्या करता प्रत्येक ध्वनी पट्टीचा आवाज कमी जास्त करून डाव्या उजव्या पट्टी करता विभागणी होते. त्यामुळे गायक/वादकातील अंतराचा व मूळ कार्यक्रमाचा आभास ऐकणार्या करता निर्माण होतो.
तर त्या संगीतकार/इंजिनिअर महाशयांना एकाच गाण्याच्या मुद्रणात चूक लक्षात आली. मला ध्वनी नियंत्रण/मुद्रणाची संपूर्ण जबाबदारी दिली गेली. त्यानंतर मी वर सांगितलेल्या पद्धतीने ३४ गाणी दोन महिन्यात ध्वनी मुद्रित केली. पण त्यांच्या मूळ ध्वनी पट्ट्या माझ्या जवळ राखून ठेवल्या होत्या त्याचे फक्त २४००० रुपये हप्त्याने मला मिळाले अजून १२००० मिळायचे होते. सहा महिने काहीच घडले नाही. सातव्या महिन्यात संगीतकार/इंजिनिअर महाशय ६००० घेऊन आले. त्यांना ३४ गाण्यांच्या तो मूळ ध्वनी पट्टी संचाची तबकडी प्रकाशित करण्या करता आवश्यकता होती. अजून दोन गाणी माझ्या कडून तयार करून घेतली व ६००० ची थकबाकी ध्वनी तबकडी प्रकाशीत झाल्या वर मिळण्याचे आश्वासन देऊन गेले.
ह्या गाण्यात किबोर्ड ने मार्गदर्शक ध्वनी पट्टी तयार केली होती. तबला, झांज, बासरी व बाजाच्या पेटीच्या वेगळ्या ध्वनी पट्ट्या तयार झाल्यावर गायकाची ध्वनी पट्टी तयार केली व मग एकत्रित डावी/उजवी ध्वनी पट्टी तयार झाली. माझ्या कामाच्या दर्जा असा होता हे दाखवणारा हा एक नमुना.
ध्वनी तबकडी प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशकाने मझ्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. प्रकाशित केलेल्या ध्वनीतबकडीवर माझे नाव छापलेच नव्हते. भर समारंभात प्रकाशकाला शेवटी चार शब्द सुनावण्याच्या आनंदातच मला समाधान मानावे लागले. मला ते शेवटचे ६००० विसरावे लागले. मग कळले की प्रत्येक गाण्याचा खर्च १०,००० असा दोन मुद्रण सेवा संस्थांनी सांगितला होता, पण माझे दर गाण्याला १००० प्रमाणे ३६ गाण्याचे ३६,००० न देता त्या प्रकाशाकाने त्यातले ६००० बुडवण्याच्या घाणेरड्या वृत्ती प्रदर्शनाचा पराक्रम केला. म्हणूनच . . . पुणे तिथे काय काय उणे! भेटू पुढील भागात.