माझे दात दाखवणे (दुखण्यामुळे) सुरू
झाले ते १९७२ पासून. आज ९ दात गमावल्यावर "दात दाखवून अवलक्षण" ह्याचा खरा
अर्थ कळला. दंतवैद्या कडे जाताना एका देव माणसाकडे जातो आहे अशा अगदी
नम्र भावनेने मी नेहमी जात होतो. १९७७ पर्यंत मी मुंबईत होतो तेव्हा एक दंतवैद्य माझा चांगला मित्र झाला होता. त्याने माझ्या दातांशी कधी खेळ केले
नाहीत. योग्य सल्ला देऊन योग्य दरात माझे दात दुखणे सांभाळले होते. योग्य
दंतवैद्य योग्य वेळेवर लाभणे हा माझ्या बाबतीत एक नशिबाचाच भाग आहे. ते
कसे ते पाहू या. फुल्या असलेले दात काढले आहेत.
दाताचे खेळ सुरू झाले ते मस्कत, ओमानला. दाताची कीड काढताना दूसर्या दाताला पण
आहे असे सांगत त्याला पण खड्डे पाडणे सुरू झाले. मी तिथे पाच दात गमावले.
त्यातल्याच एका दाताचा खेळ आजही फार चांगला लक्षात आहे. प्रथम एका भारतीय
पुरुष दंत वैद्याचे उपचार चालू होते ते फार त्रासदायक झाले म्हणून एका नवीन
दंतवैद्याला शोधून काढला पण त्याच्या कडे एक भारतीय तरुणी काम करीत होती,
मूळ दंतवैद्य फक्त अरबी बोलणार्या लोकांना मदत करीत असे.
त्या बाईचा थाट, विंग्रजी, सगळे युकेतून आल्याचे नाटक होते. सगळ्यात आधी एक्सरे
झाला, मग त्याचे निरीक्षण झाले. रुट कॅनॉल करणे आवश्यक आहे असे समजवून
सांगण्याचा खूप प्रयत्न झाला. मी फक्त एक प्रश्न टाकला ह्या सगळ्याचे पैसे
किती द्यावे लागतील? तर उत्तर होते ७०० रियाल गुणिले १३२ रुपये = ९२,४००
रुपये. त्यावर मग टोपी चढवण्याचे वेगळे पैसे (हे टोप्या लावण्याचे खास
प्रशिक्षण दंतवैद्य घेतात म्हणूनच त्यांना तसली महाविद्यालये प्रवेश देताना
आधी टोपी घालतात. ते वर्ष होते १९९१. असे लिहिण्याचे कारण, गल्ली बोळातून
असे टोपी चढवलेले व चढवणारे दंतवैद्यकीय सल्लागार मंडळी आपापली दुकाने
उघडून बसली आहेत). ह्या पैशात मला माझ्या दातापेक्षा बायको मुलांना सहा
महिने चांगले जेवण खायला घालण्याचे समाधान मिळाले होते. मला तपासणीचे ५०
रियाल द्यावे लागले होते, कारण त्या दवाखान्याच्या वातावरणाचा तो एक भाग
होता.
मी पुन्हा त्या भारतीय पुरुष दंत वैद्याचे उपचार एक वर्ष कसे तरी सहन केले.
नंतर एका भारतीय महिला दंतवैद्याशी ओळख झाली. तिने माझी रुट कॅनॉल
प्रक्रिया पूर्ण करण्यात यश मिळवले पण खर्च मात्र ३५० रियाल झाला होता.
त्याच काळात दंतवैद्यांच्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनाचे व्हिडिओ चित्रण
करण्याचे काम मिळाले होते. त्या संमेलनातील एकेक प्रक्रिया ऐकताना माझ्या
दाताच्या कळा वाढल्या होत्या, ह्याचे कारण मला झालेल्या त्रासाच्या व खर्च
झालेल्या पैशाच्या आठवणींनी मी माझे दात दाबले होते.
त्या संमेलनातून
दंतवैद्यांच्या आंतरराष्ट्रीय लूटमार समूहाचा खेळ माझ्या लक्षात आला.
आंतरराष्ट्रीय दंतवैद्यकीय उपकरणे उत्पादन कंपन्यांनी काही स्थानिक दंत
वैद्यांना हाताशी धरून नवीन उपकरणांची विक्री वाढवण्याकरता ते संमेलन
आयोजित केले होते. ती उपकरणे वापरणारे दंतवैद्य उपकरणांची योग्यता पटवून
देण्यात प्रयत्नशील होते. संमेलनात खास दुपारचे व रात्रीचे जेवण, जोडीला
खास पेयपान व्यवस्था होतीच. आभार प्रदर्शनात संमेलन आयोजकांनी उद्देश
(कोणते? लक्षात आले असेलच) साध्य झाल्याची कबुली दिली होती.
पुढे २००२ ला भारतात परतल्यावर अक्कल दाढ काढण्याची वेळ आली. सदाशिव पेठेतील
कुमठेकर मार्गावरील एका दंतवैद्याकडे मी माझ्या नातेवाईकाच्या सांगण्या
वरून गेलो होतो. वातावरण निर्मिती छान जमवलेली होती, सुमधुर संगीत होते, एक
स्वागत सुंदरी होती. एक तास वाट पाहावी लागली, प्रवेश मिळाला, दाताची
पाहणी, एक्सरे झाल्यावर कळले, तो बाबा माझी अक्कल दाढ काढण्याची शल्यक्रिया करणारा एक चिकित्सक बोलावणार होता, त्याची वेळ घ्यावी लागणार होती
म्हणून फोन वर संभाषण सुरू होते. मी ते सगळे थांबले व किती खर्च येईल ते
आधी सांगा म्हटल्यावर कळले २,५०० रुपये. मी त्या पैसे वसुली खुर्चीतून
बाहेर आलो. वातावरण निर्मितीचे २०० रुपये देऊन घरी आलो.
घरा जवळच्या कोपर्यावर नव्याने ओळख झालेले मित्र भेटले. त्यांच्याशी बोलताना
अक्कल दाढेचा विषय निघाला, " तुम्हाला चालणार असेल तर माझी मुलगी दंतवैद्य
आहे तीला दाखवा, ती मदत करेल" मी तयार झालो त्यांच्या घरी गेलो. घरात तसा
अंधार होता. एका खिडकीला लागून बरीच जुनी झालेली दंतवैद्यकीची साधने नीट
मांडलेली होती. त्यांच्या मुलीने माझे दात तपासले म्हणाली "जेवण करून या
लगेच दाढ काढून टाकू". ठरल्या प्रमाणे दुपारी त्यांच्या घरी गेलो.
रॉकेलच्या स्टोव्ह वर पाणी उकळत होते त्यात साधने उकळत होती. मित्राच्या
मुलीने फार हलक्या हाताने दोन इंजक्शने दिली, १० मिनिटाने मला समजायच्या आत
दाढ काढली होती, माझ्या हातात दिली "काका शंभर रुपये द्या." मी दोनशे काढून
दिले. ह्याच कामाचा मोबदला वेगळ्या वातावरणात, एक दंतवैद्य मला २,५०० रुपये
सहज पणे सांगून गेला होता. हे घडण्याचे कारण वैद्यकीय क्षेत्रातील
बाजारीकरण व अज्ञानाचा फायदा कमावण्याची शिकवण हेच असावे ह्या वर माझा
विश्वास बळावला.
दोन
आठवड्यापूर्वी चहा पिताना दातात वेदना झाल्या, मी दुर्लक्ष केले पण दोन
रात्री वेदनांनी बेजार झाल्यावर त्रासलेलो होतो. कोंढवा भागात कामा करता
गेलो असताना जवळच एक दंतवैद्याचा दवाखाना बघितला, आंत शिरलो, वैद्याचा
पोशाख चढवून एक तरुणी उभी होती व तिची आई एका मोठ्या टेबलामागे बसलेली
होती. सगळ्यात आधी एक्सरे झाला, मग त्याचे निरीक्षण झाले. "तुमच्या दातात
भरलेली चांदी खूप खोलवर असल्याने तुम्हाला हा त्रास होतो आहे. मी औषध लिहून
देते ते घ्या दुखणे कमी झाल्या वर माझ्या कडे या, तुमचे दात अजून भक्कम
आहेत तेव्हा आपण रुट कॅनॉल करू म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही." मी विचारले
"दात काढून टाकण्याचे किती घेता?" ती "मी दात काढत नाही त्या करता शल्यक्रिया करणारा एक चिकित्सक बोलवावा लागेल त्याचा मोबदला तोच सांगेल,
त्याकरता आधी वेळ मागावी लागेल, तुम्हाला कोणता दिवस सोयीचा आहे ते सांगा."
मी त्या बयेचा पुन्हा चेहरा बघणार नाही हे निश्चित केले. तरीही तिने
माझ्या कडून तपासणी व एक्सरेचे ३०० रुपये घेतले. घरी आल्या वर बायकोला काय
घडले ते सांगितले. बायकोने कपाळाला हात मारला, दंतवैद्याचा पत्ता, जागा
समजल्या वर बायकोने सांगितले की तीच्या इराणी मैत्रीणीला ह्याच बयेने रुट
कॅनॉल करून ७०,००० उलळले होते.
दुसर्या
दिवशी सरळ टिळक रस्त्याला असलेले माझे मित्र व एक अनुभवी दंतवैद्य
त्यांच्या कडे गेलो. ह्या आधी चार महिन्या पूर्वी माझा एक दात ह्यांनीच काढला होता.
तसेच दोन वर्षापूर्वी वरच्या दातांच्या ब्रिजचे फार चांगले काम केले होते.
त्यांच्या मुलीने मला तपासले, वेदना कमी करणार्या गोळ्या घ्यायला
सांगितल्या व चार दिवसाने दात काढण्याचे निश्चित केले.ठरलेल्या वेळेला
गेलो. वैद्य तयारीतच होते. इंजेक्शन झाले व १५ मिनिटाने सहज ती दुखणारी
अक्कल दाढ काढून माझ्या हातात आली. मोबदला फक्त १०० रुपये होता. त्या
दाढेचे हे चित्रण.
ही इतकी किडलेली दाढ त्या तरुण नवशिक्या दंतवैद्दीणीला दिसली नव्हती का? दंतवैद्यांच्या आंतरदेशीय लूटमार समूहाची ती बया सदस्या असणार ह्याची मला खात्री झाली आहे. ह्या दंतवैद्य समूहाचे सुत्रधार कोण ? तर साधने व उपकरणे उत्पादक व औषधे उत्पादक कंपन्या, विक्रेते, शिक्षण संस्था. अनुभवी (?) शिक्षक वर्ग दुकान उघडू शकणार्या उमेदवारांना सर्व प्रकारच्या मदतीची हमी देतात, विक्रेते हप्त्याने उपकरणे व साधने पुरवण्याचे काम करतात. अहो मी ज्या बये कडे गेलो होतो त्या इमारतीत व त्याला लागून पाच दंतवैद्य दुकान उघडून बसले आहेत. ह्यातील कीती वैद्य खरोखर मदत करणारे व कीती लूटमार समूही आहेत हे शोधणे एकट्याला जमणारे नाही. तेव्हा वाचक हो आपणच हे एकमेकाला कळवले पाहिजे.
ही इतकी किडलेली दाढ त्या तरुण नवशिक्या दंतवैद्दीणीला दिसली नव्हती का? दंतवैद्यांच्या आंतरदेशीय लूटमार समूहाची ती बया सदस्या असणार ह्याची मला खात्री झाली आहे. ह्या दंतवैद्य समूहाचे सुत्रधार कोण ? तर साधने व उपकरणे उत्पादक व औषधे उत्पादक कंपन्या, विक्रेते, शिक्षण संस्था. अनुभवी (?) शिक्षक वर्ग दुकान उघडू शकणार्या उमेदवारांना सर्व प्रकारच्या मदतीची हमी देतात, विक्रेते हप्त्याने उपकरणे व साधने पुरवण्याचे काम करतात. अहो मी ज्या बये कडे गेलो होतो त्या इमारतीत व त्याला लागून पाच दंतवैद्य दुकान उघडून बसले आहेत. ह्यातील कीती वैद्य खरोखर मदत करणारे व कीती लूटमार समूही आहेत हे शोधणे एकट्याला जमणारे नाही. तेव्हा वाचक हो आपणच हे एकमेकाला कळवले पाहिजे.
घरात आलो मला स्वस्थ बसवेना मी गूगल शोध सुरू केला मला हे सापडले.
जास्त माहिती ह्या दुव्यावर आहे.
http://biologicdentists.com/custom2.html
http://www.dentalexcellence.co.nz/Dental_Services/root-canals.htm
2 प्रतिसाद:
बाप रे ! कठीणच आहे जगणे. आपण ह्यांच्या टोळ्याविरुद्ध एकटे काय करू शकणार! Root Canal खरंच आवश्यक असते का हो ?
परिपूर्ण शोध माहिती आणि शोध share केल्याबद्दल मनापासून आभार.
काका माझ्या दातांची तर अनेक दंतवैद्यांनी वाट लावल्यावर मला अक्कल आली आणि मी root canal करणे टाळले आहे..
Post a Comment