October 25, 2010

नशीब भाग - ६६

२००३ च्या एका प्रसंगाने पोलिस कामकाजाचा अगदी जवळून अनुभव घ्यावा लागला. तेव्हा माझे घर कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी, पुण्यात होते. त्या एका संध्याकाळी ५ च्या सुमारास माझा मोठा मुलगा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी घेऊन जवळच्याच दुकानातून दूध घेण्या करता गेला होता. दुधाची पिशवी त्याने टांगली व दुचाकी सुरु केली. तेवढ्यात जोरात आवाज झाला, एका मोटरसायकल स्वाराने त्याला जोरात धडक दिली. आमच्या दुचाकीचे पुढचे चाक पार वाकडे झाले होते. दिवा फुटला होता. मो.सा स्वाराबरोबर मागे बसलेली तरुणी दूर फेकली गेली होती. त्या स्वाराचा पाय दुखावला होता. बाजूच्या लोकांनी व माझ्या मुलाने त्या दोघांना जवळच्या कस्तुरबा दवाखान्यात नेले होते. मुलाने घरी फोन करून मला दवाखान्यात बोलावले. 

तो मो.सा. स्वार मध्य प्रदेशचा होता. त्याच्या बरोबरच्या तरुणीने तोंड फडक्याने गुरफटलेले होते त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही ती बोलायला तयार नव्हती. मला बघून तो मुलगा पोलिसात जाण्याची धमकी देऊ लागला, त्याच्या गाडीच्या नुकसान भरपाईचे पैसे मागू लागला. मी त्याचे न ऐकता आधी दवाखान्यात त्या दोघांना माझा मुलगा घेऊन आल्याची, दोघांच्या दुचाकीचे नंबर व प्रसंग घडल्याची वेळ नोंद वाचली. त्या मुलाला दुखापत झाली नव्हती फक्त मुका मार होता, त्यावर डिपहीट फवारा मारून ते दुखणे कमी झाले होते. डॉक्टरने त्याला पेनकिलर गोळ्या दिल्या व त्याला घरी जाण्याची परवानगी दिली होती. त्याच्या त्या मैत्रिणीला बरेच खरचटले होते तिला व्यवस्थित मलम पट्टी झाली होती. जाताना तो आम्हाला कोर्टात खेचण्याची धमकी देऊन गेला. मी पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले पण मित्रांनी व शेजार्‍यांनी पोलिसांच्या भानगडीत पडू नका म्हणून सांगितले.

दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणे मी व मोठा मुलगा आमच्या ध्वनिमुद्रण कामाला सकाळी बाहेर पडलो. दुपारी दोनच्या सुमारास बायकोने मला फोन केला ती रडत होती. पोलिस घरी आले होते व त्यांनी आमच्या लहान मुलाला चौकीत नेले होते. आदल्या दिवशीच्या घडलेल्या अपघातातील मुलाने १४००० रुपये खर्चाची तक्रार आळंदी रोड पोलिस चौकीत केली होती. अ‍ॅक्टिव्हा लहान मुलाच्या नावाने असल्याने पोलिसांनी त्याला पकडले होते. मी व मोठा मुलगा ज्या कामाकरता गेलो होतो त्या संगीतकाराने त्याचा एक माणूस ज्याचा संबंध पोलिस खात्याशी जास्त होता त्याला आमच्या बरोबर दिला आम्ही सगळे पोलिस चौकीत गेलो त्यांना खरे काय घडले होते ते सांगितले. त्या मो.सा. स्वाराने दुसर्‍याच एका डॉक्टरचे प्रमाणपत्र दाखवून एक वेगळाच प्रसंग पोलिसात आमच्या विरुध्द तक्रार म्हणून नोंदवला होता.

त्याची कहाणी - तो त्याच्या मित्राबरोबर रात्री ८.३० ला (आम्ही सांगितलेल्या जागेवर) बोलत उभा होता. एक अ‍ॅकटिव्हा जोरात येऊन धडकली व त्याला मारून निघून गेली त्याच्या मित्राने गाडीचा नंबर लक्षात ठेवला. मित्राने त्याला एका डॉक्टर कडे ९ वाजता नेले तिथे त्याच्या पायाला दुखापत झाली होती त्यावर प्लॅस्टर करावे लागले होते. ह्या कहाणीवर आधारीत माझ्या मुलाला पोलिसांनी शोधून काढले व अपघात करून पळून गेल्या बद्दल दोन गुन्हे दाखल केले होते असे आम्हाला सांगण्यात आले. गुन्हा ८.३० ला झाला होता ह्याचे दोन साक्षीदार पण जमवले होते.

आमच्या बरोबर आलेल्या त्या संगीतकाराच्या माणसाने त्याची पोलिस खात्यातील ओळख दाखवून आमच्या कहाणीची सत्यता बघण्या करता एका पोलिसाला कस्तुरबा दवाखान्यात पाठवण्याची हात जोडून विनंती केली. तासाभराने तो पोलीस परतला त्याने आमची कहाणी सत्य असल्याची कबुली दिली. तासाभराने हो नाही करत माझ्या कडून २००० रुपये घेऊन त्या संगीतकाराच्या माणसाने गुन्हा नोंदणी पोलिसाला पोहचवले. मग आमच्या कहाणी प्रमाणे त्या मो.सा. स्वारावर त्याच्या मैत्रिणिचा उल्लेख करुन नवीन गुन्हा नोंदणी झाली. आम्ही सगळे प्रत्येकाचे १० वेळा आभार मानीत घरी परतलो. मला माझ्या मुलाच्या अ‍ॅकटिव्हा दुचाकी दुरुस्तीचे ३००० रुपये उगीच भरावे लागले होते. दूध आणायला पायी जाणे शक्य असताना देखील तो दुचाकीने गेला होता. एक लिटर दूधाची केवढी मोठी  किंमत आम्ही मोजली होती.

पुढल्या आठवड्यात संगीतकार मित्राने त्याच्या माणसाला वरच्या अधिकार्‍याची भेट घेण्या करता व त्या गुन्ह्याचे पुढे काय झाले ह्याचा शोध घेण्याकरता पाठवले. पण त्या गुन्ह्याची नोंद कुठेच नव्हती. आरोपी व फिर्यादी दोघांचे पैसे घेऊन पोलिसांनी त्या महिन्याच्या घर खर्चाची जुळवणी केली होती असे समजले.

वाचक हो, ह्या वरून कल्पना करणे सोपे होईल. नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल खेळातील घोटाळ्याच्या सगळ्या तपास समिती सदस्यांचे काम कसे असेल, निस्कर्ष काय असतील व त्यांच्या घर खर्चाची जुळवणी किती प्रकारांनी होईल? एकेकाचे नशीब, योगायोग समजून टाळ्या वाजवूया. असो, पुढे काय वाढून ठेवले आहे ते पचवण्याच्या तयारीला मी लागतो.
 
ह्या कोळी गीताचे चित्रण मी ओमानच्या कंताब बीचवर चित्रीत केले होते. माझ्या मोठ्या मुलाचा एक कोळी म्हणून सहभाग होता. मस्कत मराठी मित्र मंडळाच्या बाल कलकारांनी खूप मेहनत घेतली होती. जमल्यास त्यांचे कौतुक करा.