लाहानपणी जंगलाची कल्पना गोष्टीतून ऐकली होती. जंगलाचा राजा, त्याचे राज्य, त्या राज्याचे नियम ऐकले होते. जंगलातील दैनंदीन जीवन कसे असते ते पण ऐकले होते. मग चित्रकथा पुस्तकातून जंगल बघु शकलो. पुढे चित्रपट व चित्रफित माध्यमातून जंगलातील जीवन डोळ्याला दिसू शकले. पण जंगलात राहून ते जीवन समजण्याची संधी मिळाली नाही. मानव निर्मीत वस्ती, गाव, शहर, माहानगर, देश व हे अफाट जग ह्यातील मानवाची जीवन पध्दती मात्र क्षणाक्षणाला समज देत होती. प्रथम फरक जाणवला, मग नैसर्गीक जंगलाशी तूलना सुरु झाली. त्या तूलनेतून मी माझ्या क्षमतेने हे मानवी जंगल समजण्याचा प्रयत्न केला आहे.
नैसर्गीक जंगलात विवीध रोपटी, झाडे, फळे, फुले आहेत, त्यात घरटे करून राहणारे पक्षी आहेत. ह्या सगळ्यांचे अस्तीत्वाचा उद्देश काय असावा हे मी एक मानव मानवी समजुतीने समजण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच विवीध प्रकारचे पक्षी, प्राणी व जनावरे आहेत. त्या प्रत्येकाचे आगळे वेगळे वर्तन आहे, वेगळे नियम आहेत. काही जनावरे पालापाचोळा खाउन जिवंत राहाण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही जनावरे इतर जानावरांना खाउन जंगलात जिवंत राहण्याचा हक्क बजावत आहेत. ह्या सगळ्या प्रकाराला मी एक मानव मानवी समजुतीने समजण्याचा प्रयत्न करतो आहे. मानव समाजातील व्यक्ती कुवती नुसार नैसर्गीक जंगलाचे अनुकरण करण्यात मग्न आहेत असे दिसते आहे.
या अफाट जगातील मानवी जंगलात इतरांना डावलून स्वकेंद्रीत भक्षक जमाती आहेत तर काही इतरांना बरोबरोबर घेउन "जगा व जगु द्या" अशा सेवक जमाती आहेत. भक्षक जमातींच्या विवीध जाती आहेत. तोच प्रकार सेवक जमातींचा आहे. मालक, राजकारणी, मार्गदर्शक, नियंत्रक, कार्यकर्ते व पोटभरू अशा सहा मुख्यजाती भक्षक - सेवक जमातीत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. प्रत्येक जातीच्या शिड्या व त्या प्रत्येक शिडीच्या पायऱ्या समजून घेणे महत्वाचे आहे.
मालक - ह्या जातीचे मानव जमेल त्या मार्गाने शक्य असेल तिथे मालकी हक्क सांगतात, मिळवतात.
राजकारणी - मालक न होता मालक असल्याचे सगळे फायदे मिळवणे हा एकमेव उद्देश.
मार्गदर्षक - मालक होण्याची क्षमता नसल्याने हेच काम करणे मान्य करतात.
नियंत्रक - मालकाचे सांगकामे असतात.
कार्यकर्ते - मालकाला हक्क मिळवून देण्यात मदत करतात.
पोटभरू - हा मानव स्वत:च्या पोटभर जेवणा करता काही ही, कोणाही करता सदैव तयार असतो.
मालक जातीच्या पोटजातींची मोठी यादी होणे शक्य आहे. मी इथे मला समजलेल्या जातीच्या शिडीतील सगळ्यात खालच्या पायरी पासून उल्लेख करतो आहे. पायरी पहिली - राहत्या घराचा मालक - जागा झोपडिची असो की २००० चौ.फुटाची असो मनस्थीती एकाच प्रकारची असते शब्द, भाषा व मोजमाप मात्र वेगळे असते. जागा हातात येण्या अगोदर सगळी नाती एकाच पातळीत असतात. मित्र देखील समान पातळितले असतात. नवीन जागा नावावर झाल्यावर मित्र- नातेवाईकांशी संबंध बदलतात. नवीन नाती जोडली जातात. घरात दुचाकी / चारचाकी / भांडी / वस्तु बदल सुरु होतो. भक्षक मनस्थीतीत दगा फटक्याने मालक होतात तर सेवक मनस्थीतीत अनेकांच्या मदतीने किंवा सोबतीने मालक होण्याचा प्रयत्न असतो. अशाच पायऱ्या वाढत जातात शेवटची पायरी म्हणजे विवीध देशातील व्यावसायातून एकेका देशावर मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मालकांच्या मदतीने भक्षक राजकारणी जगण्याचा प्रयत्न करतात. तर सेवक राजकारणी भक्षक मालकाला दूर ठेवण्यात यशस्वी होण्याच्या प्रयत्नात समाधानी असतात.
राजकारणी व्यक्तीचे काम बालवयातच सुरु होते ते थेट जागाच्या वेशी पर्यंत जाऊ शकते. भक्षक राजकारणी व्यक्तीला फक्त सत्तेचा लोभ असतो, हा लोभ गावा पासून सुरु होतो ते थेट शक्य झाल्यास जगावर सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. असे भक्षक राजकारणी मरणोत्तर फुलांचे हार जमवण्यात का कळत नाही पण यशस्वी होतात. सेवक राजकारणी मात्र जनतेला मदत करण्याच्या प्रयत्नात खपून जातो व पक्षांना बसण्याची एक जागा तयार करतो.
जी व्यक्ती मालक अथवा राजकारणी बनु शकत नाही ती अनुभवाने शाहणी होते व मार्गदर्शक बनते. ह्या जमातीत देखील भक्षक व सेवक आहेत. भक्षक मार्गदर्शक गावातील पंचायती ते आंतर्राष्ट्रिय संस्थांमधून सहज वावरतांना दिसतात, अशी व्यक्ती स्वकेंद्रीत असल्याने जाईल तीथे गोंधळ माजवण्यात पुढाकार घेते. पण सेवक मार्गदर्शक व्यक्ती जाईल तीथे लोक कल्याणाचे यश मिळो-न-मिळो अथक प्रयत्न करते.
नियंत्रक व्यक्तीला मिळवलेल्या शिक्षणाचा फार मोठा गर्व असतो. ते शिक्षण मालक - राजकारणी जमातीला फायदा होण्या करता मार्गदर्शक जमातीनेच तयार केलेले असते. म्हणून नियंत्रक व्यक्ती मालक - राजकारणी जमातीच्या व्यावसायात अथवा कारभारात मदत करण्यात समाधानी असतात. भक्षक वृत्तीचे नियंत्रक मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग जनतेला लूबाडण्यात करतात. मात्र सेवक वृत्तीचे नियंत्रक मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग जनतेला मदत होईल असे प्रयत्न करतात.
कार्यकर्त्याला मालक - राजकारणी - नियंत्रकाची आवश्यकता असते. ह्या व्यक्तीला स्वबळावर जगणे जमत नाही. भक्षक कार्यकर्ता अपेक्षित मोबदला मिळेल तिथे काम करायला धावतो, मीळालेल्या मोबदल्याचे ईमान बाळगतो पण जनतेला लूबाडण्यात तत्परता दाखवतो. सेवक कार्यकर्ता मिळेल त्या मोबदल्यात काम करायला तयार असतो, कारण जनसेवा हाच त्याच्या जगण्याचा उद्देश असतो.
पोटभरू व्यक्तीला जगण्या करता उदरभरण हा एकमेव मार्ग असतो. भक्षक वृत्तीचा पोटभरू भुरट्या चोऱ्या, भिक मागणे, असली कामे करताना दिसतो. सेवक वृत्तीच्या पोटभरूचा प्रत्येक मदत करणारा देव असतो, त्या देवाची सेवा ह्याच एका उद्देशाने तो जगतो.
एकला चलो ही जमात होउ शकत नाही कारण अशा व्यक्तीचे वंशज त्याच्या उद्देशांना सोडून जातात. हि व्यक्ती निसर्ग प्रेमी, नैसर्गीक नियमांचे - तत्वांचे पालन करणारी असते. भक्षक वृत्तीची व्यक्ती क्षमतेनुसार जनतेला लूबाडण्याचे काम करते मात्र सेवक वृत्तीची व्यक्ती जनतेच्या सेवेतच समाधानी असते.
पुढल्या भागात ह्या सगळ्या पोटजातींचा मला मिळाणारा अनुभव ...........







