माझा धाकटा मुलगा ज्या विद्यापिठात शिकत होता त्या विद्यापिठाची मान्यता रद्द झाल्यावर तो खंडीत झालेल्या शिक्षणाने शिक्षण व्यवस्थेवर चीडला होता. खिशात पैसे असावे म्हणून कॉल सेंटर कामाच्या शोधात गेला. इंग्रजी भाषा चांगली वापरता येत होती म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवड झाली, तीन महिन्याच्या प्रशिक्षणाचे २४०००/- मीळाल्याने तो उत्साहीत होता. प्रशिक्षणात चांगले गुण मिळाल्याने त्याची निवड झाली व काम सुरु झाले, पहिल्याच महिन्यात कामाची वेळ दुपारी ३ ते रात्री १२ ची होती. कॉलसेंटरची गाडी ने-आण करत होती. पाच दिवसात गाडी कामाच्या वेळेच्या दोन तास आधी तर परतीला दोन तास उशीरा येणे सुरु झाले. मुलाने ती सेवा बंद केली व स्वत:ची दुचाकी वापरायला सुरु केले सहा महिने संपले, पावसाळा सुरु झाला तसे त्याचे भिजणे, सर्दी, किरकोळ अपघात त्रास सुरु झाले. दुचाकीच्या दुरुस्तीला बराच पैसा खर्च झाला. चीडचीड वाढीस लागली, त्यात कामाच्या व झोपेच्या वेळा बदलल्या म्हणून डोके दुखी वाढली.
मुलाची चीड चीड मी रोज अनुभवत होतो, त्याची कारणे समजून घेण्याचे मी प्रयत्न केले. पहिल्याच महिन्यात इंग्रजीचा चांगला वापर व परदेशी ग्राहकांचे योग्य शंका समाधानाची पत्रके त्याला रोज मिळत होती, त्यामुळे सहकारी त्याचा हेवा करु लागले होते. माझ्या मुलावर इतर सहकारी कामाचा बोजा ढकलत होते. गट प्रमुख सहकाऱ्यांना मार्गदर्शन / मदतीचा दबाव आणु लागला. इतर सहकारी पदवीधर असल्याने ३ ते ४ हजाराचा जास्त पगार कमवत होते पण माझा मुलगा पदवीधर नसल्याने कमी पगार मिळत होता. चीड चीड जास्तच वाढली. शेवटी हे पहिले मिळालेले काम सोडून दिले.
सुदैवाने लवकरच पुन्हा एकदा एका नावाजलेल्या कॉल सेंटरचे काम मीळाले, परंतु प्रशीक्षण मुदत संपल्यावर पहिल्या कामातील अनुभवांची पुनरावृत्ती सुरु झाली. पुन्हा डोकेदुखीला सुरवात झाली होती. इथे शंका समाधान करतांना ग्राहकाला नवीन सुटे भाग विकण्यावर जास्त भर होता. हे काम त्याचे सहकारी जास्त करून चांगले पैसे कमवत होते. त्या सहा महिन्याच्या काळात एका सकाळी त्याला दुचाकीचा मोठा अपघात झाला. छातीच्या चार बरगड्या मोडल्या होत्या, नशीब वेळेवर चांगली वैद्यकीय मदत मिळाल्याने तो त्या अपघातातून वाचला. सहा महीने फार काळजी घ्यावी लागली. पण कॉल सेंटरचे ते काम सोडावे लागले, कारण इतकी लांब सुट्टी मिळणे शक्य नव्हते.
सहा महिने असेच गेले व पुन्हा एका मोबाईल सेवा कॉल सेंटरचच्या प्रक्रियेचे काम मिळाले. दोन महिन्याचे प्रशिक्षण संपले व त्या प्रक्रियेतील भानगडी व ग्राहकांची फसवणूक समोर आली. मोबाइल सेवेच्या नियमांची ग्राहका बरोबर चर्चा करण्याची बंदी होती. स्वस्त दरात मिळणाऱ्या सेवांची मर्यादा फार कमी होती, त्या मर्यादा एका महिन्यात संपायच्या, त्यानंतर भरमसाट बील भरताना ग्राहक मदतनीसाला फार घाणेरड्या शीव्या घालत होता. माझ्या मुलाला ते सोसवले नाही, नियम न सांगणे वरून चूक नसताना शीव्या खाण्या करता पगार घेणे त्याला पटले नाही, शेवट राजिनामा देउन घरी बसला.
सहा महिने घरात बसून काढल्यावर पुन्हा एका नावाजलेल्या कॉल सेंटरचे हे चौथे काम मीळाले. इथे एका मोडेम व तत्सम उपकरणांच्या शंका समाधानाची प्रक्रिया होती. १९९२ पासून माझ्या घरात माझ्या दोन्ही मुलांना ऍपलचे LC 475 पासून ते iMac 24" असे ७ प्रकारचे कॉम्प्युटर वापरायला मिळाल्याने फार चांगला अनुभव मिळला होता. ह्या नवीन कामात त्याचा फायदा मुलाला करता आला. परदेशी ग्राहकांचे ऍपल व विंडोजचे नेटचे शंका समाधान करावे लागत होते. पहिल्या सहा महिन्यातच तो एक अती कुशल मदतनीस म्हणून गणला गेला. पहिले पूर्ण वर्ष मुलाने एकही सुट्टी न घेता रात्रीच्या दोन पाळ्यांचे काम केले, पण कोणतीही पगार वाढ अथवा बढती मिळाली तर नाहीच तर परप्रांतातून आलेल्या अनुभव नसलेल्या नवीन पदवीधर मदतनीसांना प्रशिक्षणाचा दबाव मात्र वाढला. मुलाने प्रशिक्षणाचा वेगळा मोबदला मागीतला तो नाकारला गेला. पण अदीकाऱ्यांशी वाद वाढू लागले. एका लग्नाला जाण्यासाठी मागितलेली चार दिवसाची सुट्टी संपल्यावर नाकाराण्यात आली व न सांगता गैर हजर असण्याचे कारण दाखवून नोकरीतून पळाला असे सांगण्यात आले.
मुलाने कंपनीच्या मानव संसाधन अधिकाऱ्याला काय व कसे घडले ह्याची कल्पना दिली. कंपनीने दुसऱ्या एका प्रक्रियेत मुलाला पाठवले. पण पगार कमी झाला होता. तीन महिन्यातच काम सोडावे लागले. दोन वर्षाच्या कामाचे प्रमाण पत्र नाकारण्यात आलेच होते. मुलगा फारच चीडला होता. घरात आमच्या पासून दुरवला होता, रात्री उशीराने घरात येत असे, उशीरा दुपार पर्यंत झोपत असे. दोन वर्ष काय घडणार हे बघण्यात गेली. अशात एका मानव संसाधन कंपनी ने माझ्या मुलाला वैद्यकीय विमा कंपनीच्या शंका समाधान प्रक्रियेच्या मुलाखतीला बोलवले होते. कामाकरता पदवीधर असणे आवश्यक होते पण माझ्या मुलाच्या पूर्व अनुभवामुळे त्याची नीवड झाली. तीन महिन्यात फारसे वेगळे काही घडले नाही.
एके दिवशी त्याला मानव संसाधन अधिकाऱ्याने घरी जायला सांगितले कारण तो पदविधर नव्हता, त्या प्रक्रियेला पदविधर असणे आवश्यक होते. मी मुलाला मागच्या महिन्यात काय काय घडले ते आठवायला सांगितले. असे लक्षात आले की मुलाने कॉलसेंटरच्या अधिकाऱ्याला त्या वीमा कंपनीच्या काही नियमांचे संभावित होणारे दुष परिणाम दाखवले होते. त्या अधिकाऱ्याने मुलाचे नाव पुढे करून त्या नियमांची चौकशी वीमा कंपनी कडे केली होती. हे एक कारण असावे. तसेच सहकाऱ्यांची ओळख व मैत्री ह्या विषयीच्या एका कार्यक्रमात मुलींच्या एका गटाने काही प्रश्न विचारले होते ते असे "व्यसन असणे चांगले की वाईट? उत्तर - मी कोण ठरवणार, ज्याचे त्याने ठरवावे. "
"किती गर्ल फ्रेंड आहेत, नसतील तर का नाही? उत्तर - शाळेतल्या मॉनीटर मुलींनी चार वर्षे उगीच खूप तक्रारी करून मला वर्गा बाहेर उभे केले होते. तेव्हा पासून मी मुलींच्या फारसा जवळ जात नाही. एक ही नाही, अजून गरज वाटली नाही."
"गर्ल फ्रेंड बरोबर शरीर संबंध असावेत की नाही? उत्तर - भारतात कितपत मान्यता आहे माहित नाही."
"तू समलैंगीक आहेस का? प्रश्नाचे उत्तर देण्या ऐवजी त्याने प्रश्न केला होता - तूम्हाला किती बॉय फ्रेंड आहेत व तुमचे किती ऍबॉर्शन झाले आहेत????" ह्यावर वातावरण तापले होते. त्या मुलींनी असले प्रश्न विचारल्या बद्दल मानव संसाधन अधिकाऱ्याने त्या मुलींना बरेच काही सुनावले होते.
पुन्हा कॉल सेंटरचे काम करायचे नाही असा निर्णय त्यानी घेतला.......
पुढिल पोस्ट - BPO एक "धंदा" ???????

