September 15, 2009

नशीब माझे - भाग - ५

१९६५ एसेस्सी झालो आणि आप्तांना मला वेडे ठरवायला जास्त विषय मिळाले. प्रत्तेकाने आपापल्या कुवती नुसार त्यांनी निवड केलेले विषयच कित्ती महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मी ते विषय हाताळू शकणार नाही ह्याची कबुली दिल्याबद्दल वेडा ठरलो. वडिलांनी चक्क १५० रुपये महिना  पगाराची रेल्वेची नोकरी करायला पाठवले. ती नोकरी दोन महीने मी केली. रेल्वे सिग्नलींग खात्यातील एक भांडार, त्यातल्या एका कारकुनाचा मी मदतनीस होतो. आत येणार्‍या व बाहेर जाणार्‍या नगांची मोजणी, जवळच्या टपरीतून चहाचे ग्लास, विड्या / सिगरेट / पान / गुट्गा आणणे, कामगारांच्या शिव्या ऐकणे, त्या वयात नको ती लफडी ऐकणे वगैरे कामे त्या दोन महिन्यांत मी केली. हा माझा दोष की नशिबाचा भाग ?

त्याच काळात माझ्या बाबांनी " बॉक्स वॅगन" नावाची १५० पानी पुस्तिका रेल्वे दुरुस्ती विभागा करता लिहिली होती, त्यात काही रेखाचित्र मी काढली होती. त्या पुस्तिकेच्या छपाईचे यंत्र जुळवणीत त्या छापखान्याचे मालकाला महत्त्वाची मदत करून सर्वांना चकित केले होते.


आमच्या घरा समोरच्या गाळ्यातून स्वतंत्र व्यवसाय करणारे ते सिंधी मला आदर्श वाटत होते. कारण सचोटीने वागत माझे सगळे नातेवाईक महिन्याला ८०० रुपयापेक्षा कमीच पगार मिळवत होते. परंतु घरासमोरचे ते दुकानदार दिवसाला १००० रुपये  मिळवत होते. त्यांच्यातील एकही एसेस्सी झालेला नव्हता.

त्या काळात गावा कडे इलेक्ट्रीकल वायरींग व मोटर दुरुस्ती व्यवसायात चांगली कमाई होती. मी त्या कामात पैसे मिळवत होतो पण परवाना नव्हता, आय. टी. आय चे इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण आवश्यक होते. १९६६ जिल्ह्याच्या ठिकाणी जागा मिळाली पण ६ महिन्यात काही घटना घडल्या. मी ते प्रशिक्षण सोडले. त्या प्रशिक्षण गटात मी एकटा को.ब्रा. होतो. मास्तर राखीव जागावाला होता. पहिल्या महिन्यातली पहिली चाचणी परीक्षा मला १०० टक्के गुण असूनही त्याने खोडून ९५ टक्के केले. एका राखीव जागावाल्याला एक उत्तर चूक असूनही ९६ टक्के गुण देऊन प्रथम घोषित केले त्या राखीव जागावाल्या मास्तराने. लागोपाठ तीन चाचणी परीक्षेत हाच प्रकार घडल्याने वादविवाद झाले. मोठ्या भावाने मुख्याधापकांना पत्र लिहून मदत मागितली.  त्या मास्तराला कारण दाखवा नोटीस दिली गेली. प्रकरण जास्त चिघळले. मी मास्तराला वर्गात ओरडून सांगितले " तुम्ही असेच विहिरीत बसून जग कित्ती मोठे आहे त्याची कल्पना करण्यात आनंद माना. मला ह्या विहिरी बाहेरचे जग मोकळे आहे तिथे तुमचे हात पोहचणार नाही." मी प्रशिक्षण सोडून जाण्याची कारणे लिहून बाहेर पडलो.

१९६७ पुण्यात आलो. रेडिओ दुरुस्तीचे ६ महिन्याचे रोज १ तासाचे प्रशिक्षण, मी रोज १२ तास बसण्याची परवानगी घेऊन १५ दिवसांत पूर्ण केले. गावाला परतलो. आमच्या शाळेत माझ्या शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझा आत्मविश्वास वाढवला. शाळेत वापरात असलेली ध्वनीक्षेपण, रेडिओ, प्लेअर वगैरे साधने एकत्र जुळवून एक सुंदर कनसोल बनवण्याच्या माझ्या कल्पनेला साकार करण्याचे कंत्राट मला दिले.कोणताही मदतनीस न घेता मी एकट्याने जोडणी व सुतारकाम १० दिवसात पूर्ण केले. वयाच्या १७व्या वर्षी स्वबळाने केलेल्या कमाईचे अप्रूप मला आजही आहे.

माझे ते काम बघून कन्न्याशाळेचे काम मला मिळाले. कनसोल बरोबर प्रत्येक वर्गात स्पीकर बसवण्याचे कंत्राट मला मिळाले त्याच्या ६ हजार रुपयाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे व दोन किलो पेढे घेऊन मी घरी गेलो. देवापुढे पेढे ठेवले व मला जनावर ठरवणार्‍या आईच्या हातात ६ हजाराची रोख रक्कम दिली. ती "कुठून चोरी करून आणलेस ? कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार ? जा मित्रांनबरोबर सिगरेटी, पान, हॉटेलात उडव ते पैसे, माझ्या समोर काय मिरवतोस हे पैसे ?” - नशीब माझे!