August 30, 2009

स्वयंसेवकगीरी

मी एक सच्चा पण डोळे, नाक, कान उघडे असणारा स्वयंसेवक आहे.
सुरुवातीच्या काळांत डोळे, नाक, कानाचा फारसा विचार न करता तन मन धन जसे शक्य होते तसे काम केले.
मग काही घटनांनी ह्या सगळ्याचा विचार करायला शिकवले. म्हणूनच की काय स्वयंसेवकगीरी, गांधीगीरी अशा शब्दांची योग्यता पटली.
एका मंडळात काम करताना मी बघितलेले जातीचे स्वयंसेवक असे काहीसे होते.
स्वयंसेवक नावा पुरते- ह्यांचे कपडे, वागणे, बोलणे, हात, पाय, चेहरा सगळे कसे कपड्याच्या दुकानातल्या पुतळ्या सारखे, कार्यक्रम संपल्या नंतरही स्वच्छ टिकून असते. ही एक कला आहे.
स्वयंसेवक पाठिंबा देणारे - एक छानसं हास्य टिकवत ही मंडळी " तुम्ही व्हा पुढे, हा आलोच बघा " म्हणत कोणत्याही कामातून हात झटकण्याच्या कलेतील प्रावीण्य मिळवण्याच्या खटाटोपात असतात.
स्वागत स्वयंसेवक - स्टेजच्या आजूबाजूला रेंगाळलेला, पहिल्या रांगेत नाहीच तर प्रमुख पाहुण्यांच्या च मागे मागील रांगेत जागा सांभाळून असतात.
स्वयंसेवक खानपान व्यवस्था - ही ठरावीक मंडळी कार्यक्रम संपल्यावर खाद्य पदार्थ वाया जाउ नये म्हणून पुढाकार घेतात, " आमचा फ्रीज मोठा आहे .... " हे बोलायला विसरत नाहीत.
स्वयंसेवक गाडीवाले - ह्या प्रकारात दोन पोट जाती आहेत. एक जात सावज शोधकांची, लीफ्टशोधक, तर एक जात ते, त्यांची ती, मुलं, गाडी असल्या च विषयात गुरफटलेली, इतके की पेनकिलरचे विक्रेतेच असावेत.
कढीपत्ता स्वयंसेवक - कढी / आमटीतल्या पानांचा स्वाद देणारे. मंडळातील व्यवस्थापक जन्मसिद्ध हक्क समजून ह्यांचा सहज वापर करतात. तितक्याच सहजतेने त्या पानासारखा  ह्यांना बाहेर काढतात.
खांदा स्वयंसेवक - अहो खंदा नव्हे. ही जात दोन्ही अर्थाने खांदा देण्यास तत्पर. तुम्ही ठरवायचे खांदा कुठे आवश्यक आहे.
रक्तदोश स्वयंसेवक - ही जात नसेल तर मंडळ चालू शकत नाही. कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाही. ह्यांचा चेहरा कोणी बघितलेला नसतो, कारण स्तुतीसुमनांचा वर्षाव झेलणार्‍याचा चेहरा कोण्या तिसर्‍याचा च असतो.

असाच काहीसा माझा लेख - मस्कतरंग- १९८६ हस्तलिखितातून मी लिहिला होता.